Ratnagiri News – चिपळूणच्या खेर्डीत फुलला माणुसकीचा हिरवा अंकुर; मुंबईत उपचार घेत असलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला ग्रामस्थांची धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संकटाच्या काळात माणुसकीची साथ किती मोलाची ठरते, याचा प्रत्यय खेर्डी येथील देऊळ-वरचीवाडीत आला. मुंबई येथे वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन शेवेकर यांच्या शेतीतील भातलावणीचे काम अपूर्ण राहू नये, यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत सामूहिक श्रमदानातून संपूर्ण भातलावणी पूर्ण केली.
पूर्वनियोजनानुसार महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने शेवेकर यांच्या शेतात एकत्र आले. कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांनी श्रमदान करत अल्पावधीत भातलावणीचे काम पूर्ण केले. त्यामुळे उपचारासाठी मुंबईत असलेल्या शेवेकर यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाच्या नियोजनासाठी संतोष तांदळे, संतोष उतेकर, मंगेश पवार, दिलीप शेवेकर, राजा पाष्टे, गोविंद भोसले आणि प्रकाश फाळके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांशी समन्वय साधला.
त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत देऊळ-वरचीवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले. आजच्या धावपळीच्या आणि स्वकेंद्रित जीवनशैलीत संकटात सापडलेल्या एका कुटुंबाच्या मदतीसाठी संपूर्ण वाडी एकवटल्याने ग्रामस्थांमधील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. या उपक्रमातून ग्रामीण भागातील माणुसकी, सामाजिक एकोपा आणि संकटाच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.