Ratnagiri News- कुटगिरीमध्ये लोखंडी पूल कोसळला; 10 ते 12 गुरे पुलाखाली अडकली, एका बैलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरात नदीवर असलेला लोखंडी पूल सोमवारी अचानक कोसळल्याने एक गंभीर दुर्घटना घडली आहे. पूल कोसळत असतानाच त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ गुरे पुलाखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा जागीच मृत्यू झाला असून, इतर जनावरे लोखंडी गर्डरखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीतील पाण्याचा मोठा प्रवाह आणि पुलाचे जड लोखंडी साहित्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. काही ग्रामस्थांनी स्वतः नदीत उतरून जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पुलाची जड लोखंडी रचना बाजूला सारल्याशिवाय जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे अशक्य होते. घटनेचे गांभीर्य ओळखून महसूल प्रशासन, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात आले. संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्रीसह जेसीबी मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा लोखंडी पूल सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. नवीन पुलासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून अधिकारी नुकतेच पाहणी करून गेले होते. मात्र त्याआधीच हा पूल कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हा पूल गावातील नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या रोजच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. गावाच्या पलीकडची शेती आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हाच एकमेव मुख्य मार्ग असल्याने संपूर्ण गाव या पुलावर अवलंबून होते. यापूर्वीही पूल धोकादायक झाला असताना ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून आणि स्वतःच्या खर्चाने जेसीबीच्या साहाय्याने तो उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, प्रशासनाकडून वेळेत कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पुलाची उभारणी न झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या मदतीने पुलाखाली अडकलेल्या इतर जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तीव्र वेगाने बचावकार्य सुरू आहे.