
कोणाचे नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. याचाच एक प्रत्यय पश्चिम बंगालमध्ये आला. एलपीजी गॅस सिलिंडरची 500 रुपयांची सबसिडी तपासण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेलेल्या पश्चिम बंगालमधील एका अत्यंत गरीब महिलेच्या खात्यात तब्बल 99 कोटी 99 लाख 99 हजार 997 रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. ही अवाढव्य रक्कम पाहून बँक कर्मचाऱयांचेही धाबे दणाणले. बँकेने तत्काळ खाते गोठवले असून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिह्यातील पुलतळी जामतला भागात कश्मीरा शेख ही 36 वर्षीय महिला राहते. कश्मीरा या आपल्या एलपीजी गॅस सिलिंडरची सबसिडी जमा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेल्या होत्या. मात्र तिथल्या बँक कर्मचाऱयाने जेव्हा त्यांचे खाते तपासले, तेव्हा त्यांच्या खात्यातील ही भलीमोठी रक्कम पाहून त्यालाही धक्का बसला. कश्मीरा शेख यांचे पत्र्याचे कच्चे घर असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबासह राहतात. पतीच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी जरीच्या धाग्यांचे भरतकाम करतात. त्यांचे पती पिशव्या शिवण्याचे काम करतात. खात्यात 100 कोटी रुपये आल्यामुळे बँकेने तत्काळ खाते गोठावले आहे. परिणामी कुटुंबाचे एकमेव हक्काचे बँक खाते गोठवले गेल्यामुळे आता या कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक खात्याच अचानक कोटय़वधी रुपये येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कोलकात्यातील बेलेघाटा भागात ‘क्लाऊड किचन’ चालवणाऱया नुपूर गुप्ता यांच्या बँक खात्यातही अचानक 47 कोटी रुपये जमा झाले होते.


























































