
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामध्ये (आयडॉल) चार महिन्यांनी जाहीर झालेल्या निकालात प्रथम वर्ष बीकॉमच्या 2543पैकी 2086 तर कला शाखेत 2224पैकी 1764 विद्यार्थी असे एकूण 3 हजार 850 विद्यार्थी नापास झाले आहेत. असे असताना दुसऱया सत्राचा निकाल रखडला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी ‘एटीकेटी’ परीक्षा कधी देणार? त्यांचे पॅलेंडर शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यापीठाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडे याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याची दखल घेत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, डॉ. धनराज कोहचडे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी आज कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा ‘आयडॉल’ प्रशासनाकडून देण्यात येत नाहीत. आवश्यक माहिती वेळेत दिली जात नाही, त्यामुळे हे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. या वेळी कुलसचिवांनी उद्याच आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
…तर भविष्यात ‘आयडॉल’ बंद होईल
‘आयडॉल’मध्ये 2022मध्ये तब्बल 80 हजार असणारी विद्यार्थी संख्या आता थेट 20 हजारांवर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचे निर्णय तातडीने घेतले गेले नाहीत, सुधारणा केल्या नाही तर झपाटय़ाने घटणारी विद्यार्थी संख्या पाहता भविष्यात हा विभाग बंद होईल, अशी भीती युवासेनेने व्यक्त केली आहे.



























































