
भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच, सोमवारी जळगावात मंत्री गिरीश महाजन यांना थेट प्रश्न विचारला. शहराजवळील खचलेल्या बायपास महामार्गाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. मात्र, महाजन यांनी कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले. परिणामी, “महाजन पुढे आणि पत्रकार मागे’’ असे नाटय़मय दृश्य पाहायला मिळाले.
सदर कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादानंतर गिरीश महाजन हे पहिल्यांदाच जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत प्रश्न विचारले. विशेषतः माजी खासदार हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) आमदार एकनाथ खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याविषयी झालेल्या कथित चर्चेवर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी केवळ “पक्षाने विजय चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे,’’ एवढेच म्हणत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
काय आहे ऑडिओ क्लिप प्रकरण?
विजय चौधरी यांच्या पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर महाजन आणि चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची आणखी एक ध्वनिफीत समोर आल्याने हा वाद अधिकच चिघळला. क्लिपमध्ये पेंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांचे सासरे आमदार एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविषयीही चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.



























































