
मुंबईत पाऊस स्थिरावला असताना पावसाळी आजारांनी चांगलेच ठाण मांडले आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत या वर्षी डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. गेल्या एकाच महिन्यात मलेरियाचे – 1380, डेंग्यू – 466, चिकनगुनिया – 78, गॅस्ट्रो – 851, स्वाईन फ्ल्यू – 105 तर कोविडचे 58 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत पावसाळी आजारांचा ‘ताप’ वाढला आहे.
पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिकेची सर्व रुग्णालये व आरोग्य पेंद्रांच्या परिसरात डेंग्यू-मलेरियाच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी आणि पाणी साचणाऱया ठिकाणांचा नाश करून शून्य डास प्रजनन मोहीम राबवली जात आहे. रुग्णालय परिसरातील डासांची उत्पत्ती रोखून तिथे येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांना आजारापासून वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तरीदेखील पावसाळी आजारांची संख्या वाढली आहे. हे आजार टाळण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, लक्षणे दिसल्यास पालिका रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ
जुलै 2025 मध्ये डेंग्यूचे 266, मलेरियाचे – 655, लेप्टो 33, गॅस्ट्रो 603, कोविड 27, स्वाईन फ्ल्यूचे 27 रुग्ण आढळले होते. या वर्षीच्या जुलैची तुलना केल्यास ही वाढ दुप्पट आहे.
अशी केली कार्यवाही
मलेरियाला कारणीभूत ठरणाऱया एनोफिलीस डासाची उत्पत्ती शोधण्यासाठी 54 हजार 605 विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 5 हजार 969 ठिकाणी एनोफिलीसची उत्पत्ती स्थाने आढळून आली.
डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱया एडीस डासांची उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, फेंगशुई झाडे, मनी प्लांट अशा 10 लाख 91 हजार 315 ठिकाणी सर्वेक्षण केले. यामध्ये 21924 ठिकाणी एडीस आढळला.
पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेने जुलैच्या एकाच महिन्यात तब्बल
6 लाख 59 हजार 316 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 75 हजार 650 ठिकाणी प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे रक्ताचे नमुने घेण्यात आले. शिवाय विविध ठिकाणी 123 आरोग्य शिबिरेही घेण्यात आली.



























































