
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना झाला. पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्पॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी गडकरी यांचा राजानीमा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
टिळक भवन येथे बोलताना सपकाळ म्हणाले की, मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठय़ा तक्रारी पुढे येत आहेत. गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहने बंद पडली.
गडकरींच्या घरावर मोर्चा
इथेनॉल मिश्रित इंधन प्रकरणावरून आज युवक काँग्रेसने नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घरावर जन आक्रोश आंदोलन करून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.



























































