
स्वर स्वामी कला साधना संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वर्धापन दिन सोहळा व महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘कराओके, कहा से आये बदरा’ संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. चेंबूरच्या छेडा नगर जिमखाना येथे पार पडलेल्या या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान रफी यांना सुरेल मानवंदना देण्यात आली.
स्वर स्वामी कला साधना संस्थेचे सौरभ, गणेश, प्रियंका आणि राजेश हुनारी यांनी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘कराओके, कहा से आये बदरा’ संगीत मैफल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रत्येक कलाकाराने जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गीतांचे अप्रतिम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. तसेच बालकलाकार प्रवज्जा साळवे हिने हिंदी गाण्याचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
कार्यक्रमाला मै अलबेला ग्रुपचे संजय तावरे व किरण तावरे, दूरदर्शन कलाकार दीपक गोईल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी बनसोडे, छायाचित्रण चरण सर, ध्वनी व्यवस्थापन प्रदीप सावर्डेकर यांनी केले.



























































