क्लस्टरवरून ब्लॉकबस्टर राडा; शिंदे गट नाईकांच्या घरावर धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबईत क्लस्टरअंतर्गत धोकादायक इमारतींच्या सुरू असलेल्या पुनर्विकासावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या ब्लॉकबस्टर राडा सुरू झाला आहे. वन मंत्री गणेश नाईक यांनी एफएसआयच्या अतिवापराला कडाडून विरोध करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केल्यानंतर शिंदे गटाचा तिळपापड झाला आहे. नाईकांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात टांग आडवी घातली तर त्यांच्या घरावर धडक मोर्चा काढू, अशा इशारा शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी देऊन या वादात उडी घेतली आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पुनर्विकासाच्या आड येणाऱ्या सर्व जाचक अटी काढून टाकल्यानंतर शहरात धोकादायक इमारतींचा पुनर्विकास वेगाने सुरू झाला. मात्र आता या पुनर्विकासावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात तुफान राडा सुरू झाला आहे. वन मंत्री गणेश नाईक यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत क्लस्टरच्या माध्यमातून होत असलेल्या पुनर्विकासावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या थयथयाट सुरू केला आहे. नाईक यांनी त्यांची ही भूमिका जर कायम ठेवली तर त्यांच्या घरावर धडक मोर्चा काढू, असा इशारा विजय चौगुले यांनी दिला आहे.

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यामध्ये सहाय्यक नगर रचना संचालक सोमनाथ केकाण यांचे सर्वात मोठे योगदान आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या वादात त्यांना आता लक्ष्य केले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत केकाण यांना परत पाठवण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. शिंदे गट आणि भाजपमधील वाद शिगेला पोहचल्यामुळे अधिकाऱ्यांचा सॅण्डविच झाले आहे.