
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे. कामाचे अतिरिक्त तास व त्यामानाने मिळणारा कमी मोबदला, रजा घेण्यास येणाऱ्या अडचणी, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गैरसोयी याबाबत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रत्येक विभागात मंजूर पदांच्या निम्मे सुरक्षा कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ओव्हरटाईम ड्युटीचा भार पडत आहे. या सर्व तक्रारी सोडवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी बैठक बोलवावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.
सुरक्षा अधिकाऱयांकडून सुरक्षा कर्मचाऱयांना दिल्या जाणाऱया मानसिक त्रासासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) यांना पत्र लिहिले आहे. सुरक्षा कर्मचारी काही ठिकाणी सलग दहा-पंधरा दिवस बंदोबस्त डय़ुटी करतात. मात्र डय़ुटीदरम्यान वैयक्तिक कामासाठी किंवा अचानक आलेल्या कामासाठी त्यांना नैमित्तिक रजा देण्यात येत नाही. त्यांना गैरहजर दाखवले जाते. कर्मचाऱयांच्या खात्यात जास्त शिल्लक रजा असतानाही रजा मंजूर केली जात नाही. पालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱयांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. चौपाटीसारख्या ठिकाणी डय़ुटीवर असताना कोणत्याही सुविधा नसतात. बसण्याची व्यवस्था, बाथरूमची सोय किंवा पावसामध्ये कसलीही व्यवस्था नसते, अशा तक्रारी अतिरिक्त आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. या तक्रारी सोडवण्यासाठी बैठक घेण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पत्राद्वारे केली आहे.




























































