लॉटरीची तारीख ठरेना… ‘म्हाडा’चे 75 हजार अर्जदार वेटिंगवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-mhada-lottery-delay-75000-applicants-waiting-for-2640-houses-draw-date

मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल या आशेने तब्बल 75 हजार अर्जदारांनी म्हाडाच्या 2,640 घरांसाठी अर्ज भरले. परंतु चार महिने झाले तरी मुंबईतील घरांच्या लॉटरीची तारीख आणि वेळ निश्चित होत नसल्यामुळे अर्जदारांचा संताप अनावर झाला आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे संगणकीय सोडतीचा कार्यक्रम रखडल्याचीदेखील चर्चा आहे.

म्हाडाने 30 मार्च रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी विविध उत्पन्न गटांसाठी 2,640 घरांसाठी सोडत मार्चमध्ये जाहीर केली होती. सुरुवातीला 15 मे रोजी त्यानंतर मुदतवाढ देऊन 5 जूनला लॉटरी काढण्याचे सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर लॉटरीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येईल, असे म्हाडाकडून कळविण्यात होते.

दोन दिवसांत तारीख जाहीर करू

लॉटरीबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाला विचारले असता दोन दिवसात लॉटरीची तारीख आणि वेळ निश्चित करू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसांत नक्की लॉटरीची तारीख जाहीर होणार की म्हाडाकडून पुन्हा तारीख पे तारीख मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

अर्जदारांना आर्थिक भुर्दंड

घरांसाठी अर्जदारांनी दहा हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरली आहे. काहींनी अनामत रक्कम भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला आहे. परंतु लॉटरी रखडल्यामुळे अर्जदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. दुसरीकडे अनामत रकमेपोटी म्हाडाच्या तिजोरीत अडीचशे ते तीनशे कोटी रुपये जमा झाले आहेत.