
खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांना खडसावल्यानंतर आता अजित पवार गट सरसावला आहे. ‘दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता भुजबळांना पालकमंत्री करून नाशिक खड्डेमुक्त करा’, अशा मागणीचे होर्डिंग्ज लावून अजित पवार गटाच्या युवक आघाडीने महाजनांवर निशाणा साधला आहे.
सिंहस्थ कामाच्या निमित्ताने शहरभर मुख्य रस्ते खोदून ठेवले आहेत, इतर रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे, अपघाताने सहा बळी गेले आहेत, गिरीश महाजन लक्ष द्या, कुंभमेळा नाशिककरांच्या मुळावर नको, लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला होता. यानंतर महाजन-भुजबळ हे एकाच व्यासपीठावर येवूनही एकमेकांशी बोलले नाहीत. रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी प्रभावी उपाययोजना न करता तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने नाशिककरांमध्ये संताप कायम आहे. भाजपाच्या अपयशावर बोट ठेवून भुजबळ समर्थकांनी महाजन यांची कोंडी सुरू केली आहे. नाशिकला खड्डेमुक्त करण्यासाठी भुजबळांना पालकमंत्री करा, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणारे होर्डिंग्ज अजित पवार गटाच्या युवक आघाडीने लावले आहेत. जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक सात आमदार असल्याने त्यांनी सुरुवातीपासूनच पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे.
जे कारभारी आहेत त्यांनी जास्त लक्ष द्यावं- भुजबळ
कुंभमेळा प्राधिकरण, नाशिकचे जे कोणी कारभारी आहेत, त्यांनी जास्त लक्ष द्यावं, असा सल्ला देत मंत्री छगन भुजबळ यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला. सोमवारी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ‘खड्ड्यांमुळे लोकांचे मृत्यू झाले आहेत. प्रसारमाध्यमांमधून, नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय, म्हणजे काहीतरी होतंय हे निश्चित. रस्ते दुरुस्ती करताना त्याशेजारचा रस्ता सुस्थितीत असावा, खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही याची काळजी घेतली जावी’. तीन मंत्री असूनही नाशिककडे दुर्लक्ष होतंय का, यावर ते म्हणाले, ‘मी जास्त बोलू शकत नाही. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे व्हावीत. जे कोणी कारभारी आहेत त्यांनी जास्त लक्ष घालावं’, असा सल्ला त्यांनी महाजनांना दिला. ‘मला पालकमंत्री करण्याच्या लावलेल्या होर्डिंगवर मी नाराजी व्यक्त केली आहे, ते होर्डिंग काढण्यास सांगितले आहे’, असेही ते म्हणाले. ‘भुजबळ आणि माझे जवळचे संबंध आहेत, आमच्यात दुरावा नाही’, अशी सारवासारव गिरीश महाजन यांनी केली.


























































