
फरीदाबादमधील एका खासगी शाळेत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. सिक्रोना गावातील एका शाळेत शिक्षिकेवर बुधवारी सकाळी मास्क घालून आलेल्या हल्लेखोराने चाकूने 30 हून अधिक वार करून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे ही शाळा पोलीस चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे.
संध्या (29) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, अमित (21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एक तरुण तोंडावर मास्क बांधून शाळेच्या प्रवेशद्वारावर आला आणि तिच्या पतीचे नाव सांगून तिला मुख्य प्रवेशद्वारावर भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र संध्या बाहेर आल्यावर त्या आरोपीने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. अवघ्या तीस सेकंदांच्या आत त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर 30 हून अधिक वार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी शिक्षिकेची मान पकडून तिला बाहेर ओढताना आणि जमिनीवर पाडून सपासप वार करताना स्पष्टपणे दिसत आहे. किंचाळण्याचा आवाज ऐकून शाळेतील सर्व मदतीसाठी धावले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर पुन्हा जमिनीवर पडलेल्या संध्या यांच्या पोटात व चेहऱ्यावर सुमारे 20 वेळा चाकूने वार करून आरोपी नंबर प्लेट नसलेल्या बाईकवरून घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत संध्या यांना अल फलाह रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अमित फरिदाबादमधील कोट गावचा रहिवासी आहे. त्याला काही तासांतच अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, तो सिक्रोना येथील सरस्वती सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये शिकवणाऱ्या संध्याचा पाठलाग करत होता आणि तिने त्याच्याशी सर्व संपर्क तोडल्यानंतर व छळ सुरू ठेवल्यास पोलिसांकडे जाण्याची धमकी दिल्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला.सकाळी साडेनऊच्या सुमारास अमित, आपला चेहरा स्कार्फने अर्धवट झाकून शाळेत शिरला आणि त्याने शाळेतील कर्मचाऱ्यांना संध्याला कळवायला सांगितले की, ‘विकी’ तिला भेटायला आला आहे, असे म्हणत त्याने तिच्या पतीचा उल्लेख केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा हल्ला काही क्षणांतच घडला आणि त्या तरुण इंग्रजी शिक्षिकेला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

























































