ठसा – पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शीतल धनवडे

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय कारकीर्द आधार घेत असताना मधेच राजकारणातून निवृत्ती घेत शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेणारे व्यक्तिमत्त्व विरळच. पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील हे त्या मोजक्या अपवादात्मक व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. शिक्षण क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासात लाखो सर्वसामान्य मुला-मुलींच्या शैक्षणिक आयुष्याला दिशा देण्याचे पवित्र कार्य डी.वाय. पाटील यांनी केले. त्यांच्या निधनाने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील ‘ज्ञानदूत’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. वारकरी परंपरा असलेल्या कसबा बावडा येथील एका शेतकरी कुटुंबात 22 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण एम.ए., एल.एल.बी., पी.एच.डी. झाले. अमेरिकेतील ऑरिझोना विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डी.लीटने, तर नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाने डॉक्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. डी.वाय. पाटील यांचे वडील यशवंतराव पाटील हे नामवंत प्रगतिशील शेतकरी होते. त्यांनी 1946मध्ये कसबा बावडा शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून राजाराम हायस्कूलद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. वडिलांचा अध्यात्म, शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील हा वारसा डॉ. पाटील आणि त्यांच्या पुढील पिढीने समर्थपणे पुढे चालविला आहे. 1955-59मध्ये वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी श्रीराम को-ऑप. सेवा संस्थेचे चेअरमन या नात्याने डी.वाय. पाटील यांनी स्थानिक शेतकरी, कष्टकरी, अपंग व विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य केले. 1957मध्ये कोल्हापूर नगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून ते निवडून आले. 1960 ते 62 या काळात ब्लॉक डेव्हलपमेंट कमिटी, ता. करवीरचे चेअरमन म्हणून त्यांनी शेती व सिंचनासाठी विविध योजना आखून हरितक्रांतीला चालना दिली. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. 1967 ते 1972 या काळात विधानसभेचे आमदार म्हणून त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि मागास घटकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांना आर्थिक व शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी रामराव आदिक एज्यु. सोसायटी स्थापन केली. कॉन्टीनेंटल मेडिकेअर फाऊंडेशन केली. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE), पश्चिम विभाग (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) अभियांत्रिकी शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांना मान्यता देणे वा नूतनीकरणाचे काम त्यांनी या परिषदेमार्फत केले. कसबा बावडा येथे 1992 साली आयोजित 65व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1969मध्ये त्या वेळच्या राष्ट्रपती पदाच्या गाजलेल्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेले उमेदवार व्ही.व्ही. गिरी यांच्या बाजूने महाराष्ट्रातील केवळ चारच आमदार होते. त्यापैकी एक डॉ. डी.वाय. पाटील होते. त्यामुळेच नंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. डी.वाय. पाटील यांची राज्यातील राजकीय कारकीर्द बहरणार असेच त्या वेळी वाटले होते. मात्र डी.वाय. यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत शिक्षण क्षेत्रात वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे राज्यपाल पद डी.वाय. पाटील यांनी जरूर सांभाळले. मात्र त्यांचे पूर्ण आयुष्य हे शिक्षण क्षेत्रासाठीच जणू होते. त्यात त्यांनी स्वतःला एवढे वाहून घेतले की, डी.वाय. पाटील म्हटले की, आज डोळय़ांसमोर उभे राहते ते त्यांचे प्रचंड विस्तारलेले शैक्षणिक साम्राज्य आणि त्या माध्यमातून त्यांनी दिलेले शिक्षणातील बहुमूल्य योगदान. अत्यंत दूरदृष्टीने डी.वाय. पाटील यांनी त्यांच्या शिक्षण संस्थांचा विस्तार देशभरात केला. आज या साम्राज्यात 182 शिक्षण संस्था, तीन अभिमत विद्यापीठे, पाच राज्य खासगी विद्यापीठे आणि इतर असंख्य संस्थांचा समावेश आहे. देश-विदेशातील दीड-दोन लाख विद्यार्थी आज तेथे शिक्षण घेत आहेत. या संस्थांमधून बाहेर पडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी देश-विदेशात नाव कमावले आहे. क्रीडा क्षेत्रातही डी.वाय. पाटील यांचे मोठे योगदान राहिले. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या क्रीडा दूरदृष्टीचे प्रतीक म्हणावे लागेल. आज डी.वाय. पाटील आपल्यात नसले तरी त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांचे उत्तुंग कार्य कायम सोबत राहील.