
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगणारा महेंद्रसिंग धोनी चेन्नईमध्ये बाईक चालवताना दिसला आहे. धोनीची कार आणि बाईक्सची आवड कोणापासूनही लपलेली नाही. सध्या सोशल मीडियावर धोनीचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल झाले आहेत. यामध्ये धोनी ‘जेन झी’लाही लाजवेल अशा वेगात मोटरबाईक चालवत आहे. धोनीने चेन्नईमधील इंटरनॅशनल सर्किट (इरुंगट्टुकोट्टाई) येथील रेस ट्रकवर बाईक चालवून सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये धोनी आंतरराष्ट्रीय सर्किटवर आपल्या राईडचा आनंद घेताना दिसला. त्याने कोणतीही कसर न सोडता अतिशय वेगाने काही फेऱ्या पूर्ण केल्या. तो पिट लेनमध्ये परत येताच फोटोग्राफर्सनी त्याला घेरले. या 45 वर्षीय आयकाॅनने आपले हेल्मेट काढले आणि शेकडो उत्साही चाहत्यांना हात दाखवला. त्याच्या राईडचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि गर्दीत उत्साह संचारला.


























































