
शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह तसेच गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. मंगळवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ शकली नाही. यावेळी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केलेल्या विनंतीवरून सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बुधवारी सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार दुपारी 2 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मागील तीन वर्षांपासून शिवसेनेचे प्रकरण प्रलंबित आहे. अनेक दिवस ‘तारीख पे तारीख’ चालल्यानंतर गेल्या आठवडय़ात सुनावणी सुरु झाली होती. त्यावेळी शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. त्यांचा उर्वरित युक्तिवाद मंगळवारी होणार होता. मात्र, वेळेअभावी सुनावणी होऊ शकत नसल्याचे दिसताच सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुनावणी बुधवारी घेण्याबाबत विचारणा केली. त्यावर सिब्बल यांनी होकार देतानाच हे प्रकरण प्राधान्याने सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी आधी मिसलेनियस प्रकरण घ्यावी लागतील, असे नमूद केले. यावेळी सिब्बल यांनी, दुपारी 2 वाजता वेळ दिल्यास सुनावणी होईल, अन्यथा नेहमीप्रमाणे आमच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच येईल, असे म्हणणे मांडले.































































