
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले असताना गणेशोत्सव दीड महिन्यावर आला असूनही अद्याप पालिकेकडून अनेक मूर्तिकारांना शाडूची माती, इकोफ्रेंडली रंग देण्यात आलेले नाहीत. याबाबत पालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात प्रकरणावर नियमित सुनावणी सुरू आहे. यानुसार लवकरच निर्णयही येणार आहे. मात्र यावर्षी गणेशोत्सव तोंडावर आला असताना पालिकेकडून शाडू माती, रंग देण्यात आलेले नसल्याने मूर्तिकारांची गैरसोय होत आहे. मातीची मूर्ती बनवण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी लागतो. तर पीओपीच्या तीन दिवसांत ३० मूर्तीही बनू शकतात.
गणेशमूर्ती बनवण्याचे काम अनेक मूर्तिशाळांमध्ये जानेवारीपासूनच सुरू होते. त्यामुळे अजूनही आवश्यक साहित्य मिळत नसल्याने मूर्तिकारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे याबाबत पालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर रितू तावडे यांना पत्रही दिले आहे.



























































