
लग्नासाठी नकार दिला म्हणून मामाच्या मुलाची सटकली. तोच राग मनात धरून तरुणाने मुलीच्या भावाचे सहा महिन्यांच्या बाळाचे कुर्ला परिसरातून अपहरण केले. पण ही बाब कळताच विनोबा भावेनगर पोलिसांनी युद्धपातळीवर शोध सुरू करून अवघ्या चार तासांत बाळाला शोधून काढले. पोलीस माग काढणार हे लक्षात येताच त्याने ठाण्यात त्या बाळाला सोडून पळ काढला, पण पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.
रविवारी सकाळी पाच-साडेपाच वाजण्याच्या सुमारास सहा महिन्यांचे बाळ पालकांसमवेत घरात झोपलेले होते, पण काही वेळाने बाळ जागेवर नसल्याचे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आजूबाजूला कुठेच मुलगा दिसत नसल्याने पालकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाणे गाठून सहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ निरीक्षक अमित ताड यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन मुलाचा कसून शोध सुरू केला. परिसरातील सर्व निर्जन स्थळांची तपासणी करण्याबरोबर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा अमन सकट (25) हा तरुण मुलाला घेऊन विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसला. त्यामुळे त्या स्थानकावरील फुटेज तपासल्यावर तो ठाण्याच्या दिशेने ट्रेनमधून घेऊन जात असल्याचे दिसले. उपायुक्त गणेश शिंदे यांनी ठाणे पोलिसांनी संपर्क साधून त्यांना मुलाचे अपहरण करून एक तरुण ठाण्यात आल्याचे अवगत केले. अखेर विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाळ सुखरूप मिळून आले, पण अमन सापडला नव्हता. तो मुलाला सोडून सटकला होता. अखेर त्याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
अमनला मामाच्या मुलीसोबत लग्न करायचे होते. अमनला मुलगी पसंत होती, पण तो नशा करत असल्याचे कळल्यावर मुलीच्या लोकांनी त्याला लग्नासाठी नकार दिला होता. हाच राग त्याच्या डोक्यात होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.



























































