
भरपावसात शेतात राबणाऱ्या बळीराजाच्या मदतीला शिवसेना धावून गेली आहे. शेतीची कामे करताना धुवाधार पावसापासून शेतकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावळी निजामपूर विभागातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
गावखेड्यातील पुरुष आणि महिला शेतशिवारात भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत. धुवाधार पावसात राबणाऱ्या या शेतकऱ्यांना निजामपूर येथील जनसेवा पतसंस्थेच्या आवारात शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रेनकोटचे वाटप करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रेनकोट वाटपातून शेतकऱ्यांचे संरक्षण होईलच पण शिवसेना त्यांच्या भक्कम पाठीशी आहे हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे, असे संजय कदम यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन महाड विधान-सभाप्रमुख जनार्दन मानकर यांनी केले होते.
यावेळी रायगड जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, उपजिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे, विधानसभाप्रमुख जनार्दन मानकर, महिला आघाडी संघटक रंजना लुष्टे, लहु लुष्टे, पोलादपूर शहरप्रमुख नीलेश सुतार, प्रशांत हिलम, देऊ हिलम, अशोक हिलम, प्रमोद गोविलकर, महेश पवार, शेतकरी, शिवसैनिक व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



























































