इस्माईल युसूफ कॉलेज संकुलाचा नियोजनबद्ध विकास करा! शिवसेनेची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी पूर्व येथील इस्माईल युसूफ कॉलेज संपुलातील 55 एकर जागेचा टप्प्याटप्प्याऐवजी एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने विकास करून तिथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

इस्माईल युसूफ महाविद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि वसतीगृह उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. कॉलेजच्या संपुलाच्या 55 एकर जागेचे प्लॅनिंग करून विकास करावा, मैदानालगत मिनी स्टेडियम उभारावे, हॉलीबॉल आणि बॅटमिंटन मैदानात सुधारणा करावी, पूर्वेकडील संरक्षण भिंतीची आणि मुख्य रस्त्याची दुरुस्ती करावी, सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, पर्जन्य जलवाहिनीची दुरुस्ती करावी आदी मागण्या या वेळी आमदार अनंत नर यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण सचिव रेड्डी प्रधान, उच्च व तंत्र शिक्षण संचालक देवळांकर, इस्माईल यूसुफ महाविद्यालय प्राचार्य स्वाती वाव्हळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता गुंजन दिघावकर, परदेशी, मराठे, विजय पाचरेकर आदी उपस्थित होते.