जंतरमंतरवरील लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर यावर मोदी-शहा मौन; त्यांना ‘गुंगा गुड्डा’ म्हणावं लागेल, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनात झालेला लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर यावरून संसदेमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दाही गाजत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये येऊन यावर निवेदन द्यावे अशी मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत अनुपस्थित आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहांवर हल्ला चढवला आहे.

जंतरमंतरवर लाठीचार्ज कुणी केला, अश्रुधुराच्या नळकांड्या कुणी फोडल्या, पेलेट गन कुणी चालवल्या यावर गृहमंत्री अमित शहा मौन बाळगून आहेत. म्हणते त्यांना गुंगा गुड्डा म्हणावे लागेल. पंतप्रधान मोदींनाही गुंगा गुड्डा म्हणावे लागेल, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली.

संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संसद ठप्प झाली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कामकाज होणार नाही. जंतरमंतरवर लाठीचार्ज कुणी केला, पेलेट गन चालवण्याचे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याचे आदेश कुणी दिले हे गृहमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहात येऊन सांगत नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही. राम मंदिर लुटीचाही विषय गंभीर आहे. हा विषय दोन्ही सभागृहात घेतला जात असून यावर सुद्धा पंतप्रधानांना निवेदन द्यावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे म्हणत हिणवल्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार चकमक उडाली आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका सहन न झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात धडक देत गोंधळ घातला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यासारख्या टोलेजंग व्यक्तीमत्वाला सुद्धा गुंगी गुडिया म्हटले होते. त्यांनी हे सहन केले आणि आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले की मी गुंगी गुडिया नसून स्वतंत्र निर्णय घेणारी, देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी स्त्री आहे. पुढे इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान म्हणून काम केले त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार काम करतील, असे संजय राऊत म्हणाले. तसेच काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा त्यांनी लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे. त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. अमित शहा जसे लपून बसले आहेत, ती भूमिका त्यांनी स्वीकारली आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, जंतरमंतवर आंदोलन करण्यापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या दारात जाऊन आंदोलन केले पाहिजे. कॅबिनेटने हा प्रस्ताव तयार केला आणि उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव दिल्लीला पाठवला होता. आता ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला आले, तेव्हाच दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी झळकली पाहिजे होती. ती झळकली का? याला जबाबदार कोण आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. मिस्टर शिंदे आठवड्यातून सोळा वेळा दिल्लीला येतात. मुख्यमंत्री आठवड्यातून चार वेळा येतात. मग केंद्राच्या विषयाकडे त्यांना हा पाठपुरावा करता येत नाही का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.