
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा हे टीव्हीवरील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक नात्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. दोघेही गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळे राहत असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून घटस्फोटाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या चर्चांवर अमृता आणि हिमांशू यांनी स्वतः स्पष्टीकरण देत घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता आणि हिमांशू गेल्या सुमारे 18 महिन्यांपासून वेगवेगळ्या घरांमध्ये राहत आहेत. मात्र, त्यांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही किंवा कायदेशीर विभक्त होण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय कोणत्याही मोठ्या वैवाहिक वादामुळे घेतलेला नसून, वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे घेतल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती, करिअरमधील वेगवेगळ्या प्राथमिकता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांसारख्या अनेक कारणांचा त्यांच्या निर्णयावर परिणाम झाला. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या घरांमध्ये राहणे दोघांनाही अधिक योग्य वाटत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वेगळे राहत असले तरी त्यांच्यातील संवाद पूर्णपणे तुटलेला नाही. दोघेही एकमेकांच्या संपर्कात असून वैयक्तिक तसेच व्यावसायिक बाबींवर चर्चा करत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याला नेमकं कोणतं वळण मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या चर्चांनंतर अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी दोघांनीही विभक्त होण्याच्या अफवा फेटाळून लावल्या. “आम्ही अजूनही विवाहित आहोत. आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक चर्चा करायची नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे सध्या दोघे कायदेशीररित्या पती-पत्नी असून घटस्फोटाची कोणतीही अधिकृत प्रक्रिया सुरू असल्याची पुष्टी झालेली नाही.
अमृता आणि हिमांशू यांची प्रेमकहाणी आजची नाही. दोघांची पहिली भेट 2004 मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स’या रिअॅलिटी टॅलेंट शोदरम्यान झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि कालांतराने या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी जानेवारी 2015 मध्ये लग्न केले. लग्नानंतरही त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.


























































