
लोकसभेत विरोधकांची जबरदस्त एकजूट पाहायला मिळत असून आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
कनिष्ठ सभागृहात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी पुन्हा एकदा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्यानंतर ही भेट झाली.
२० जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत लोकसभेत एकदाही प्रश्नोत्तराचा तास पूर्ण होऊ शकलेला नाही. गदारोळाच्या वातावरणात कोणतीही चर्चा न होता पाच विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या सातत्यपूर्ण घोषणाबाजीमुळे बुधवारीही लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना आपल्या जागेवर जाऊन बसण्याचे आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू होऊ देण्याचे आवाहन केले.




























































