
हॉमियोपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचारांची परवानगी देण्याविरोधात राज्यभरातील एक लाखाहून अधिक डॉक्टरांनी आजपासून अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सरकारी आणि महापालिका रुग्णांतील बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) सेवा ठप्प झाली आहे. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल झाले आहेत. दरम्यान, सरकारसोबतची बोलणी निष्फळ ठरली असून उद्या, गुरुवारी जर तोडगा निघाला नाही तर संप चिघळून रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स आणि सुपरस्पेशालिटी राज्य संघटना यांनी संयुक्तपणे आंदोलनात सहभाग घेतला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ओपीडी विभाग बंद होता. मात्र नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित ऑपरेशन थिएटर्स, नियोजित वैद्यकीय प्रक्रिया, आंतररुग्ण सेवा, केंद्रीय प्रयोगशाळा सेवा तसेच शैक्षणिक उपक्रम सुरळीतपणे सुरू होते.
मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयांतील ओपीडी सेवा ठप्प झाल्याने रुग्णांचे हाल झाले. पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दिवसाला सुमारे दोन हजार ओपीडी रुग्ण असतात. त्याखालोखाल शीव येथील रुग्णालयातील दिवसाला सुमारे 1800 रुग्ण येतात. आज आंदोलनामुळे या सर्व रुग्णांना फटका बसला.
आंदोलन कशासाठी
‘सीपीएमपी’ पात्र होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्यात येणार आहे. म्हणजेच होमियोपॅथी डॉक्टर अॅलोपॅथी उपचार करू शकणार आहेत. ही प्रक्रिया न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यास आरोग्य सेवांवरील विश्वास धोक्यात येईल, असा डॉक्टरांचा दावा आहे.
पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयांतील ओपीडी सेवा विस्कळीत झाली. या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, प्रोफेसर यांच्यामार्फत ओपीडी विभाग चालवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मोठय़ा प्रमाणात निवासी डॉक्टर आंदोलनात उतरल्याने सेवेवर परिणाम झाला. मात्र अन्य सेवा सुरू होत्या. – डॉ. शुभम सोळंकी, अध्यक्ष, केईएम मार्ड






























































