
राजकारणात उतरण्याऐवजी देशातील व्यवस्था बदलासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी एक भक्कम ‘दबाव गट’ म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आगामी काळात काम करेल. देशात सध्या ‘ई-20 इंधन’ हा मोठा मुद्दा बनला आहे. याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, अशी घोषणा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली.
नीट पेपरफुटीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन उभारत यशस्वी लढा दिल्यानंतर ‘कॉक्रोच पार्टी’च्या कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक आजपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली. या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी सीजेपी आता इथेनॉलमिश्रित इंधन (ई-20) धोरण, वाढती बेरोजगारी आणि झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.
देशात आज राजकीय पक्षांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मतदार सकाळी एका पक्षाला मतदान करतात आणि संध्याकाळी वेगळेच सरकार स्थापन होते. नागरिक ज्या पक्षाचा आमदार किंवा खासदार निवडतात, तो संध्याकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. मतदान डिलीट होण्याचे प्रकार घडतात आणि तेही नाही झाले तर ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय पक्ष पह्डले जातात. या सगळ्यामुळे जनता अत्यंत त्रस्त झाली आहे, म्हणूनच देशाला आता नवीन राजकीय पक्षाची नव्हे, तर व्यवस्थेवर अंकुश ठेवणाऱ्या एका स्वतंत्र ‘प्रेशर ग्रुप’ची गरज असल्याचे अभिजीत दीपके म्हणाले.
आंदोलकांना वैद्यकीय आणि कायदेशीर मदत
‘नीट’ आंदोलनादरम्यान ज्या आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, पॅलेट गनचा वापर करून ज्यांना जखमी करण्यात आले त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सर्व जखमी आंदोलकांना वैद्यकीय मदत तसेच कायदेशीर मदत दिली जात असल्याचे सीजेपी प्रवत्ते सौरभ दास यांनी स्पष्ट केले.
व्यवस्थेवरून जनतेचा विश्वास उडालाय
देशातील जनता राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरील विश्वास गमावून बसली आहे. त्यामुळेच सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. कारण हा केवळ शिक्षणाचा प्रश्न नव्हता, तर या संस्थांमधील उत्तरदायित्वाचा मुद्दा होता, असे दीपके म्हणाले.
देशात सध्या जे काही चुकीचे घडत आहे त्यामुळेच लोक आपली विचारधारा आणि राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र आले आहेत. भारतात आता खऱ्या अर्थाने एक सामाजिक चळवळ उभी राहत आहे.
देशात आधीच शेकडो राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत, मात्र तरीही तरुणांचे आणि नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे सीजेपी हा राजकीय पक्ष न बनता तळागाळातील एक वैचारिक चळवळ म्हणून काम करेल.






























































