
बाप्पाच्या भव्य मूर्तींचे आगमन पाहण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे भाविकांचे दागिने, पाकीट आणि मोबाईलवर डल्ला मारतात. या चोरीच्या घटनांना आळा घालून गणेश आगमन सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी सेनेने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश आगमनाच्या काळात परळ विभागातील सेंट्रल रेल्वे मैदान व गणसंकुल, करी रोड येथे भव्य मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पाच्या आगमनाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. हीच संधी साधत चोरटे भाविकांच्या मौल्यवान वस्तू लांबवून पळ काढतात. अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी सेनेने भोईवाडा पोलिसांकडे केली आहे. संघटनेचे रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी संघटनेचे भारत म्हाडगुत, दिलीप वैष्णव, निळू पाटकर, सिद्धेश पावसकर आदी उपस्थित होते.





























































