
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरीही दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत केंद्र सरकारने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हजारो संतप्त भूमिपुत्रांनी आज दिल्लीतील जंतर मंतरवर निदर्शने केली. या आंदोलनात रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील भूमिपुत्र सहभागी झाले होते.
शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर यावर केंद्राने काहीच निर्णय घेतला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नुसते आश्वासन देत आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांच्या भावना तीव्र असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, नीलेश लंके, बजरंग सोनावणे, धैर्यशील पाटील, संजय सिंग, शिवसेना उपनेते बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, आगरी-कोळी युथ फोरमचे अध्यक्ष नीलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत मडवी सहभागी झाले होते.
दिबांच्या नावाशिवाय कोणत्याही नावाची तडजोड होणार नाही : संजय राऊत
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले त्याचवेळी ‘दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा बोर्ड लागणे आवश्यक होते. मात्र विमानतळाला नाव न देताच उद्घाटन उरकण्यात आले. सरकारच्या डोक्यात कोणाचेही नाव असले तरी दिबांच्या नावाशिवाय कोणत्याही नावाची तडजोड केली जाणार नाही. दिबांचे नाव डावलण्याचा अविचार ज्या दिवशी सरकारच्या मनात येईल, त्याच दिवशी महाराष्ट्रातून भाजप संपलेला असेल, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.





























































