
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून २० जुलै रोजी लाठीमार करत पेलेट गनने हल्ला करण्यात आला. यातील चार आंदोलक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थिनींनी आपली व्यथा मांडली. ‘‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिल्यावर आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. आम्ही शांतपणे चाललो असताना एका पोलीस अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने मारहाण केली,’ असे या विद्यार्थिनींनी सांगितले. ‘२० जुलै रोजी आम्ही पोलिसांच्या पेलेट गनचा सामना केला आणि आता आमचे ट्रोलिंग केले जात आहे,’ असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.
या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी त्यांना माध्यमांसमोर घेऊन आले. मुंबईच्या रिया अहिर हिच्यासह फराह नाझ आणि नूतन टपो यांनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीची संपूर्ण माहिती दिली.
माफी मागण्याची गरज नाही – राहुल गांधी
‘आंदोलकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. ही मुले देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाहीसाठी लढली, त्याबद्दल त्यांचे आभार! या मुलांनी माफी मागण्याची गरज नाही,’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.
त्यांच्या डोक्यात घाण भरली आहे – रिया अहिर
‘मला घाणेरड्या भाषेत ट्रोल केले जात आहे. त्यांच्या डोक्यात घाण भरलेली आहे. २७ जुलै रोजी मी तक्रार केली होती, मात्र आजपर्यंत मला एफआयआरची (FIR) कॉपी मिळालेली नाही,’ असे रिया अहिरने सांगितले.































































