Jammu Kashmir – पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगाचा स्फोट, लष्कराचे दोन जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भूसुरुंगाचा स्फोट होऊन लष्कराचे दोन जवान जखमी झाले. मेंढर क्षेत्रातील कांगा गली येथे बुधवारी रात्री जवान भूसुरुंग निकामी करण्याच्या प्रयत्नात असताना हा स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले.

मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, गस्त घालताना लष्कराच्या जवानांना हे भूसुरुंग आढळले होते. त्यानंतर ती निकामी करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूसुरुंग निकामी करताना त्याचा स्फोट झाला आणि यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले.

दरम्यान, नलवा देगवार तेरवान परिसरात गंजलेले आणि न फुटलेले स्फोटक (unexploded ordnance) सापडले. नंतर लष्कराच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने ते सुरक्षितपणे नष्ट केले. हे स्फोटक म्हणजे हँड ग्रेनेड असावा असा अंदाज आहे. त्या भागात रस्ते बांधणीचे काम करणाऱ्या काही मजुरांना ते आढळले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.