
नवी दिल्लीतील आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारविरोधात एक मोठा दावा केला आहे. सरकारचा डिझेल आणि विमान इंधनामध्ये (ATF) इथेनॉलचे मिश्रण करण्याचा विचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वाढत्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काही वर्षे नवीन वाहने खरेदी करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
सरकारने यापूर्वी ई-20 इंधन लागू केल्यानंतर आता पेट्रोलमध्ये 50 टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळण्याचा घाट घातल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. केवळ वातावरण शांत होण्याची सरकार वाट पाहत असून, याआधी ई-0 आणि ई-10 वाहनांमध्ये ई-20 पेट्रोल सक्तीने वापरल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आज नवीन ई-20 वाहन खरेदी केल्यास भविष्यात त्यात ई-50 पेट्रोल टाळून नुकसान केले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, लवकरच डिझेलमध्येही इथेनॉल मिसळले जाईल, असा दावा करत नागरिकांनी सध्यातरी नवीन पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये बोलताना त्यांनी, मोदी सरकार एव्हिएशन टर्बाइन फ्यूलमध्ये (ATF) सुद्धा इथेनॉल मिसळण्याची योजना आखत असल्याचा दावा केला आहे. यामुळे विमानांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांच्या संदर्भाने दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि ई-20 दोन्ही इंधने पर्यायाने उपलब्ध करून द्यावीत आणि इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या किंमती कमी कराव्यात, अशी प्रमुख मागणी केली होती.





























































