
अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यात अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. दुधातील भेसळ, अॅनालॉग पनीरवर बंदी घालणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अगदी एक झुरळ आढळले म्हणून बड्या रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला. “झुरळांनी काय करून दाखवले हे आपण सर्वांनी पाहिले आहे,” असे सांगताच, “आपण जे खातोय ते आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?” असा प्रश्न प्रत्येक ग्राहकाने विचारायला हवा, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘भविष्यवेध’ या संवादात लेखक अरविंद जगताप आणि प्रशांत आहेर यांनी तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना झुरळापासून मद्यापर्यंत अनेक विषयांवर प्रश्न विचारण्यात आले, त्यावर मुंढे यांनी सडेतोड उत्तरे दिली.
“कँटीनमध्ये एक कॉक्रोच (झुरळ) सापडला तर एवढं काय झालं, असं त्या चालकाने तुम्हाला विचारलं नाही का?” असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावर “कॉक्रोच काय करू शकतो हे मागच्या काही दिवसांत आपण सगळ्यांनी पाहिले आहे,” असे म्हणत मुंढेंनी आपला हजरजबाबीपणा दाखवून दिला आणि मुंढेंच्या या हजरजबाबी उत्तराने बालगंधर्व रंगमंदिरात हास्याची कारंजी फुलली.
पुढचं टार्गेट चायनीज फूड
मुंढे यांनी यावेळी चायनीज फूडचा किस्साही सांगितला. “कॉलेजला असताना पुणे विद्यापीठात चायनीजच्या गाड्या असायच्या. पाषाण रोडला मी पहिल्यांदाच चायनीज फूड खाल्लं. तोपर्यंत मला चायनीज माहिती नव्हतं. लोक म्हणतात आता चायनीज फूडवर कारवाई करा; आता तिकडेही लक्ष द्यायचं आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांचे पुढचे टार्गेट चायनीज फूड असेल, अशी शक्यता आहे.
मद्य हा विषय माझ्याच अखत्यारीत
काही महिन्यांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी मद्यामुळे २० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मद्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. इतर शीतपेयांसोबतच मद्याचीही तपासणी करण्याची गरज आहे. हा विषय माझ्या अखत्यारीत येतो, असे सांगून मुंढे यांनी मद्यउत्पादक आणि विक्रेत्यांना इशारा दिला आहे.



























































