
रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर केवळ पदार्थाची चवच नाही, तर अन्नाची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणेही महत्त्वाचे आहे. अन्न खराब असल्यास त्यातून फूड पॉइझनिंगसह पोटाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवण करण्यापूर्वी काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अलीकडील एका सर्वेक्षणानुसार, हिंदुस्थानातील केवळ 32 टक्के लोकांनी त्यांच्या शहरातील रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधील स्वच्छता आणि फूड सेफ्टीची व्यवस्था चांगली असल्याचे सांगितले. सुमारे 42 टक्के लोकांनी ती सरासरी असल्याचे म्हटले, तर 9 टक्के लोकांनी परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे सांगितले. या सर्वेक्षणात देशातील सुमारे 244 जिल्ह्यांमधील 91 हजार लोक सहभागी झाले होते.
सर्वप्रथम पदार्थाचा वास तपासा. अन्नातून आंबट, कुबट किंवा नेहमीपेक्षा वेगळा वास येत असेल तर तो पदार्थ खाणे टाळा. संबंधित पदार्थाबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे तक्रार करा.
अन्न वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात आणि कपडे स्वच्छ आहेत का, याकडेही लक्ष द्या. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असेल तर स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पदार्थाचा रंग नेहमीपेक्षा वेगळा किंवा असामान्य दिसत असेल तर सावध राहा. रंगात मोठा बदल जाणवत असल्यास तो पदार्थ चाखण्याचेही टाळावे.
पदार्थाची चव आंबट, कडवट किंवा नेहमीपेक्षा वेगळी वाटत असेल तर पैसे वाया जाऊ नयेत म्हणून तो पदार्थ खाऊ नका. खराब अन्नामुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते.
जेवण वाढलेली प्लेट, ग्लास आणि चमचे स्वच्छ आहेत का ते तपासा. त्यातून दुर्गंधी येत असेल किंवा त्यावर घाण दिसत असेल तर त्वरित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या.
कच्चे मांस, भाज्या किंवा इतर पदार्थ चुकीच्या पद्धतीने साठवलेले आहेत का, याकडे लक्ष द्या. शिजवलेले अन्नही योग्य तापमानात आणि स्वच्छ पद्धतीने ठेवणे आवश्यक असते.
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील स्वच्छतेची स्थिती समजून घेण्यासाठी तेथील बाथरूमकडेही लक्ष देता येते. बाथरूम अत्यंत अस्वच्छ असेल तर संपूर्ण हॉटेलच्या स्वच्छतेबाबत सावध राहणे योग्य ठरू शकते.




























































