
शहरातील एका रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला चक्क दोन महिन्यांचे वीज बिल तब्बल 2 लाख 18 हजार रुपये आले आहे. महावितरण एवढ्यावरच थांबले नाही तर बिल न भरल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घराचा वीजपुरवठाही खंडित केला आहे.
प्रभावती श्रावणे असे या महिलेचे नाव असून त्या हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर भागात राहतात. या ठिकाणी त्यांचे तीन खोल्यांचे अगदी साधारण घर आहे. घरात तीन लाईट, दोन पंखे आणि एक टीव्हीसाठी विजेचा वापर होतो. परंतु यासाठी महावितरणकडून त्यांना तब्बल 2 लाख 18 हजार रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले. प्रभावती श्रावणे यांच्या हातात जेव्हा दोन लाखांचे बिल आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यात दोन लाख रुपये एकत्र पाहिले नाहीत, तेवढे पैसे आता वीज बिलासाठी कुठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे.
- महावितरणकडून या बिलामध्ये सवलत देण्यात आली असून एक लाख 32 हजार रुपये भरावेत असे सांगण्यात आल्याचा दावा प्रभावती श्रावणे यांनी केला आहे. मात्र रोजंदारीवर कुटुंब चालवणाऱया या महिलेपुढे आता एक लाख 32 हजार रुपये भरायचे तरी कुठून, हा मोठा प्रश्न आहे.































































