
सत्ताधारी भाजपने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू पुरवठय़ाच्या कामात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळेच शाळा सुरू होऊन दोन महिन्यांनंतरही विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उघड केला. आदित्य ठाकरे यांनी धारावी ट्राझिस्ट पॅम्पमधील शाळेची पाहणी करून सद्यस्थिती उघड केली.
‘जेम’ पोर्टलवरून शालेय वस्तू खरेदीचा प्रस्ताव आणला तेव्हा सत्ताधाऱयांनी सर्व शैक्षणिक साहित्य वेळेत मिळेल अशा वल्गना केल्या होत्या. आता शाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर आता या वस्तूंचे वाटप केले जात आहे. आम्ही सत्तेत असताना गेल्या दहा-पंधरा वर्षांत पालिकेच्या शिक्षण विभागात मोठी प्रगती झाली. व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब देण्यात आले. तीन लाखांवर विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण देण्यात येत होते, मात्र सद्यस्थितीत भाजपच्या घोटाळय़ांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याची टीकाही त्यांनी केली. आता तर अनेक शाळांचे भूखंड खासगी लोकांच्या हातात सोपवले जात आहेत. याला आम्ही तीव्र विरोध करू असेही ते म्हणाले. यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, आमदार महेश सावंत, नगसेविका श्रद्धा जाधव, हर्षला मोरे, अर्चना शिंदे, नगरसेवक अंकित प्रभू, जोसेफ कोळी, टी जगदीश आदी उपस्थित होते.
‘मिड डे मील’ खारट, दर्जाहीन… विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया ‘मिड डे मील’ची तपासणीही यावेळी केली. यामध्ये खारट, पोषणविरहित आणि दर्जाहीन आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तांदूळ मोठा वापरला जातो, गरम मसाल्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे असा आहार खाऊन मुलांची प्रकृती बिघडणार नाही का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी ‘मिड डे मील’ची ‘एफडीए’कडून तपासणी करण्याचा इशाराही देण्यात आला. या खिचडीसाठी देण्यात येणारा तांदूळ पेंद्राकडून देण्यात येतो. मात्र तो दर्जाहीन आहे. त्यामुळे राज्य सरकारने दर्जेदार तांदळाचा पुरवठा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पालिका शाळेतील गोरगरीब, मध्यमवर्गीय मुले भुकेसाठी ‘मिड डे मील’ खातात. आमचा कोणत्याही बचत गटाला विरोध नाही. मात्र प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आहारात सुधारणा करा, अशी मागणीही शिवसेनेने केली.






























































