
शिक्षण महर्षी डॉ. डी.वाय. पाटील यांना आज आदरांजली वाहताना नेरुळ येथील विद्यापीठाचे पॅम्पस अक्षरशः गहिवरले. या विद्या संकुलातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह नवी मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रातील डी.वाय. पाटील यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यापीठातील सेंटर फॉर एक्सलेन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी डी.वाय. पाटील यांना आदरांजली अर्पण करत विद्यापीठाचे कुलपती विजय पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
डॉ. डी.वाय. पाटील यांचे शैक्षणिक, राजकीय, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यभर त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. नवी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरातील त्यांच्या चाहत्यांना त्यांना आदरांजली वाहता यावी यासाठी नेरुळ येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, विधिमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी उपस्थित राहून डी.वाय. पाटील यांना आदरांजली वाहिली. डी.वाय. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी विद्यापीठाच्या संकुलात मोठी गर्दी केली होती. सेंटर फॉर एक्सलेन्ससमोर चाहत्यांची मोठी रांग लागली होती.
नाते जपणारे महान व्यक्तिमत्त्व
डॉ. डी.वाय. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व फक्त महानच नव्हे तर नाते जपणारे होते. त्यांची आमच्या कुटुंबाशी गेल्या अनेक वर्षांची मैत्री अजूनही घट्टच आहे. आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आणि समाजाच्या विविध घटकांतून नागरिक येथे आले आहेत. यावरून त्यांचे संबंध प्रत्येक घटकाशी किती जिव्हाळ्याचे होते याची प्रचीती आली. डी.वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देण्याचे काम केले नाही तर त्यांच्यावर संस्कारही घडवले. त्यामुळे त्यांच्या या महान कार्याचा वारसा त्यांच्या भावी पिढीकडून पुढेही सुरूच राहणार आहे, अशी भावना या वेळी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.






























































