
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांचे वेळापत्रक मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाले. अनेक गाड्यांना २० ते ३० मिनिटांचा विलंब झाल्यामुळे मुसळधार पावसात मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. सकाळपासून दुपारपर्यंत अप व डाऊन मार्गावरील गाड्या अत्यंत धिम्या गतीने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अंधेरी, बोरीवली, वांद्रे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकाचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. त्यापाठोपाठ मंगळवारीही लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढला असतानाच प्रवाशांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी कार्यालयात वेळेत पोहोचण्याची धावपळ करताना प्रवासी रेल्वे स्थानकांत खोळंबले. चर्चगेट आणि विरार अशा दोन्ही दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावल्या. जलद गाड्यादेखील ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जात होत्या. इंडिकेटर्सवर गाडी येण्याची अपेक्षित वेळ चुकीची दाखवली जात होती. “आम्ही अंधेरी स्थानकात चर्चगेट लोकलची प्रतीक्षा करत होतो. इंडिकेटरवर गाडी येण्याची अपेक्षित वेळ दोन मिनिटे दाखवली. पण प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवर गाडीची १५ मिनिटे वाट पाहावी लागली,” अशी प्रतिक्रिया वर्सोवा येथील दिलीप कुडतरकर यांनी दिली.






























































