
आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुर्वेदिक औषधनिर्मिती संस्थांच्या तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. पुण्यातील मे. कालिदास गांधी, बारामतीमधील कृष्णा हर्बल आणि जेजुरी एमआयडीसीतील इंडकेअर फार्मा या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली.
एफडीएतर्फे राज्यातील ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची तपासणी करण्यात आली. नियमांची पायमल्ली करणाऱ्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या, तर १० संस्थांमध्ये गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आढळल्याने त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.































































