
ऐन पावसाळ्यात अलिबाग शहराला लागून असलेल्या गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चेंढरे गावातील नळांना पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा आज स्फोट झाला. गावातील महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर धडक दिली. धनदांडग्यांच्या फार्म हाऊसला मुबलक पाणी मिळते, मग भूमिपुत्रांची थेंबभर पाण्यासाठी वणवण का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला.
अलिबागला लागूनच असलेल्या चेंढरे गावाला पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. पावसाळा सुरू असतानाही नळाला पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी पाणी येते तर कधी अनेक दिवस पाणी गायब होते. या परिस्थितीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. एका हातात रिकामे हंडे आणि एका हातात तिरंगी झेंडे घेऊन निघालेल्या मोर्चातून आमचे पाणी पळवणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा घुमत होत्या.
लोकसंख्या वाढली, पाणीपुरवठ्याची योजना जुनीच
गेल्या काही वर्षांत चेंढरे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. जुन्या घरांच्या जागी इमारती उभ्या राहत आहेत. फार्म हाऊस आणि बंगल्यांची संख्याही वाढली आहे. एकीकडे वसाहती आणि लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठ्याची योजना मात्र बाबा आदमच्या जमान्याची आहे, असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
































































