
“धर्मकार्य करणाऱ्या धीरजसिंह परदेशी यांचा हल्ल्यात झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने ५० लाखांची मदत व कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत नोकरी द्यावी,” अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. तसेच “या प्रकरणी गुन्ह्यातील आरोपींचे पाकिस्तान व पॅलेस्टाइनशी कनेक्शन असल्याची माहिती सत्ताधारी नेत्यांनी दिली आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याने या कनेक्शनची सीबीआय चौकशी करावी,” अशी मागणीही काळे यांनी केली आहे.
यासंदर्भात किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.
धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील हल्लेखोरांना रसद पुरवली गेली तसेच आरोपींचे पाकिस्तान-पॅलेस्टाइनपर्यंत कनेक्शन असल्याचे आरोप एसपी ऑफिस चौकात रविवारी झालेल्या सभेत भाजपचे संग्राम भंडारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केले होते. तसेच “काही लोकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्या जातात,” असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. सत्ताधारी लोकप्रतिनिधींची ही माहिती खरी असेल, तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाकर्तेपणा आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या या तिन्ही नेत्यांच्या आरोपांची सरकारने गंभीर दखल घेऊन त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सत्ताधारी नेते व कार्यकर्त्यांचे वाईन शॉप, बीअर बार राजरोसपणे सुरू
किरण काळे म्हणाले, “धीरजला श्रद्धांजली देण्यासाठी अहिल्यानगरकरांनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवस बंद पाळला. मात्र, सत्ताधारी नेते तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचीच हॉटेल्स, परमिट रूम्स, वाईन शॉप्स आणि बीअर बार राजरोसपणे सुरू आहेत.” त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत काळे यांनी हा दुटप्पीपणा योग्य नसल्याचे म्हटले आहे. काही लोक या दुःखद घटनेच्या आडून राजकीय पोळी भाजत आहेत. राष्ट्रवादीची ‘बेमुदत बंद’ची भूमिका अयोग्य असून, बेमुदत बंदऐवजी आरोपींना कठोर शासन हीच धीरजला खरी श्रद्धांजली ठरेल, असे काळे यांनी स्पष्ट केले आहे.
‘पाकिस्तान-पॅलेस्टाइन कनेक्शन’चा दावा; मग पुरावे कुठे आहेत? – शेख
धीरज परदेशी यांच्या मृत्यूने अहिल्यानगर हादरले असतानाच आता या प्रकरणाला ‘पाकिस्तान-पॅलेस्टाइन कनेक्शन’ची किनार असल्याचे आरोप पुढे आल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सत्ताधारी आमदार संग्राम जगताप आणि संग्राम बापू भंडारी यांनी हा दावा केला आहे. मात्र, “यासंदर्भातील पुरावे कुठे आहेत? आणि जर पुरावे असतील, तर ते पोलिसांच्या स्वाधीन का केले गेले नाहीत?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
































































