गडचिरोलीतील आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द, तपासणी अधिकारीही निलंबित; सर्पदंशाने तीन बळी गेल्यानंतर सरकारला जाग, गावकुसातल्या आश्रमशाळांचेही ऑडिट करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. त्या प्रकरणाचे पडसाद आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे तसेच या आश्रमशाळेचा तपासणी अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले.

आदिवासी समाजातील मंत्र्यांनी हा गंभीर मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान उपस्थित करून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधित आश्रमशाळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारोतराव कोवासे यांची असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जावी असाही सूर बैठकीत उठला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या भावनांचा आदर राखत याप्रकरणी कडक कारवाई होईल असे आश्वासन दिले. संबंधित आश्रमशाळेत शिक्षक नसेल, वॉर्डन नसेल, शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा दिली जात नसेल तर या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा. तसेच केवळ रस्त्यावरच्या आश्रमशाळांची पाहणी करू नका, गावकुसातल्या अंतर्गत भागातील आश्रमशाळांचीसुद्धा नियमित तपासणी करा, असेही निर्देश त्यांनी दिले. याचसोबत मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी आणि सर्व विभागांना त्यात समाविष्ट करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

आदिवासी विभागाचा निरीक्षक दरमहा तपासणी करणार

आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी, आदिवासी विभागाचे निरीक्षक दरमहा आश्रमशाळांची तपासणी करून अहवाल देतील असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन मुली दगावल्या आहेत तर तीन मुलींवर उपचार सुरू आहेत, त्या आश्रमशाळेत मुख्याध्यापक, शिक्षक नव्हते फक्त दोन कर्मचारी होते, अशी माहिती देतानाच या अनुदानित आश्रमशाळेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थांकडून तपासणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.