
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा 20 दिवसांनी लोकलज्जेखातर संसदेत आले. शेवटी वंदे मातरम् होते तेव्हा यावेच लागते. त्या तीन मिनिटांसाठी ते खाली मान घालून आले आणि मुखदर्शन देऊन पळून गेले. 56 इंच वगैरे काही नाही. मैं हू… वगैरे विषय संपला असून आता दिल्ली खाली करायची वेळ आली आहे, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर हल्ला चढवला. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना बळजबरीने घट्ट मिठी मारून राहुल यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली. मिठी मारणे म्हणजेच परराष्ट्र धोरण असे मोदींना वाटते, असे राहुल म्हणाले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी दिलेले प्रेझेंटेशन अख्ख्या जगाने पाहिले आणि देशाच्या पंतप्रधानांची छी थू झाली. भारतासारख्या देशासाठी परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे. जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा वाढवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी विदेश मंत्रालया काम करते. पंतप्रधानांनी कुठल्याही देशात जाऊन बनावट मेडल्स घेणे किंवा एआयने बनवलेले पुरस्कार घेणे, मिठ्या मारणे याला परराष्ट्र धोरण म्हणत नाहीत.
देशाच्या पंतप्रधानांनी या देशाच्या संविधानाची प्रतिमा डागाळली आहे. डिलिमिटेशन बील मंजूर होण्यासाठी आजही वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे संविधानाला डागाळण्यासारखेच आहे. शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे हे पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे काम आहे का? कश्मीरला हल्ले होत आहेत, मणिपूर पेटलेले आहे, देशामध्ये अस्वस्थता आहे, तरुण वर्ग चिडलेला आहे, बेरोजगारी, महागाई वाढली आहे, रुपया घसरतो, देशाची पत जागतिक स्तरावर घसरतेय याच्यावर पंतप्रधानांना टेलिफ्रॉम्प्टरशिवाय बोलता येईल का? असा सवाल करत मोदी-शहांना 2029 च्या आधी जावे लागेल अशा प्रकारची परिस्थिती जागतिक स्तरावर आणि देशात सुद्धा आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी भाजप-आरएसएस हा जोकरांचा समूह असल्याची टीका केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, भाजप जोकरच असून दोन मोठे जोकर मोठ्या पदावर बसलेले आहेत. ते कोणत्या लेव्हलचे जोकर आहेत हे जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांनी दाखवलेले आहे. मोदी-शहांच्या नेतृत्वात चाललेल्या सरकारकडून देशाला काय मिळाले? धार्मिक उन्माद, हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान… दुसरीकडे आरएसएस राष्ट्रभक्त संघटना मानत असेल तर सर्वात आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत येऊन पत्रकार परिषद घ्यावी आणि मोदी-शहांची पोल खोलावी, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. राम मंदिर देणगी चोरी, विद्यार्थ्यांवरील अत्याचारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भ्रष्ट आणि क्रूर तानाशहाचा राजीनामा मागण्यासाठी, लोकशाहीसाठी असा गोंधळ घालावा लागतो. या परंपरेला अरुण जेटली, सुषमा स्वराज यांनीच मान्यता दिलेली आहे. लोकशाहीतील हे मोठे हत्यार आहे. जेव्हा देशाचा सैतानी गृहमंत्री मुलांवर पेलेट गन चालवतो, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडतो, दादागिरी करतो, पक्ष फोडतो, माणसं विकत घेतो तेव्हा अशा अमित शहांचा राजीनामा मागण्यासाठी जर संसदेमध्ये आम्हाला आवाज उठवावा लागला करत त्याला गोंधळ म्हणता येणार नाही. ती लोकशाहीच्या संरक्षणाची कवचकुंडले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.




























































