
ज्युनियर एनटीआरच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांच्या आगामी ‘ड्रॅगन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एनटीआरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर १२ ऑगस्टला हैदराबादमधील KIMS रुग्णालयात त्यांच्या खांद्यावर आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. १३ ऑगस्टला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचं वृत्त आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार या दुखापतीचा परिणाम आता ‘ड्रॅगन’च्या शूटिंगवर होणार आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी मात्र एनटीआरच्या रिकव्हरीच्या काळाचा उपयोग दुसऱ्या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी करण्याचा निर्णय घेतल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे प्रभासचा ‘सालार २’. रिपोर्ट्सनुसार, ‘ड्रॅगन’चं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ‘सालार २’च्या पुढील टप्प्याकडे वळण्याची प्रशांत नील यांची मूळ योजना होती. मात्र, एनटीआरला आता काही काळ शूटिंगपासून दूर राहावं लागणार असल्यामुळे नील यांना ‘सालार २’च्या प्री-प्रॉडक्शनवर अधिक वेळ देता येणार आहे. त्यामुळे सालार रिलीज होण्याची तारीख आता अलीकडे येणार आहे. त्यामुळेच प्रभासच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर असणार आहे.
या काळात पटकथा तसेच ॲक्शन सीक्वेन्सचं नियोजन, प्री-व्हिज्युअलायझेशन यासारख्या कामांकडे आता लक्ष देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशांत नील यांनी ‘सालार २’चे निर्माते होंबाळे फिल्म्सचे विजय किरागंदूर यांची भेट घेतल्याचंही वृत्त आहे. दोघांमध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. ‘सालार २’चं तात्पुरतं शीर्षक ‘सालार २: शौर्यांगा पर्व’असं सांगितलं जात आहे. चित्रपटाची अंतिम पटकथा तयार असल्याचाही दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
याचा अर्थ ‘ड्रॅगन’चं काम पूर्णपणे थांबणार आहे, असं नाही. एनटीआरशिवाय शूट करता येणारे सीक्वेन्स आधी पूर्ण करण्याचा पर्याय निर्मात्यांकडे असल्याचं सांगितलं जात आहे. एनटीआरच्या प्रकृतीनुसार त्यांच्या परतीचं नवीन शूटिंग शेड्यूल ठरवलं जाण्याची शक्यता आहे.




























































