विरोध करण्याचा विद्यार्थ्यांनाही अधिकार; नालासार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची नोंदणी रोखल्यावरून सरन्यायाधीशांनी फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील नालासार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या हस्ते दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ इंडियाने या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास नकार दिला होता. याप्रकरणी सरन्यायाधीशांनी बार काऊंसिलला फटकारले आहे. विद्यार्थी चुकीचे असतील तरीही त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. हा माझा आणि विद्यार्थ्यांमधील मुद्दा असून बार काऊंसिल या प्रकरणी नाक खुपसणारे कोण? अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत.

देशातील बेरोजगार तरुणांना ‘कॉक्रॉच’ म्हटल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधात तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे हैदराबाद येथील नालासार या विधि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ इंडियाने नालासार विद्यापीठाच्या 2026 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी रोखण्याचे आदेश दिले होते. त्यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश म्हणाले, विद्यार्थ्यांचा निर्णय चुकीचा किंवा त्यांना कोणी चुकीचा सल्ला दिला असेल. तरीही त्यांना मुद्दा मांडण्याचा आणि विरोध करण्याचा अधिकार आहे. हा माझा आणि विद्यार्थ्यांमधील मुद्दा आहे. यात नाक खुपसणारे बार काऊंसिल कोण? असा प्रश्न करत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले. न्या. सूर्य कांत यांनी बार काऊंसिलला नोटीस बजावली असून विद्यापीठाच्या कोणत्याही विद्यार्थी किंवा फॅकल्टीविरोधात दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले.

विद्यार्थी कायद्याच्या मर्यादेत राहून आपला मुद्दा मांडत असतील तर त्यांना परवानगी द्यायला हवी. मी स्वतः विरोधी निदर्शनांमध्ये सक्रिय स्वरूपात सहभागी होणारा विद्यार्थी होतो. – सरन्यायाधीश सूर्य कांत