मराठी कवींचे ‘आबा’ गेले, ऋषितुल्य कवी द.भा. धामणस्कर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी पृथ्वीचा; पाण्याचा चुकून शिडकावा झाला तरी उमलून येणारा…’, ‘कवितेची वही गच्च भरून गेलिय.. आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत…’ अशा अनेक तरल व भावगर्भ कविता लिहिणारे ऋषितुल्य कवी द. भा. धामणस्कर (96) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. आयुष्यभर ‘प्राक्तनाचे संदर्भ’ शांतपणे उलगडून दाखवणारे मराठी कवींचे ‘आबा’ हरपले आहेत. द.भां.च्या निधनामुळे मराठी कवितेच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

द.भा. उर्फ दत्तात्रेय भास्कर धामणस्कर हे गेली अनेक दशके डोंबिवलीत राहत होते. तरुण वयापासूनच त्यांनी कवितेची वाट धरली ती शेवटपर्यंत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. धामणस्कर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. द.भां.च्या निधनाचे वृत्त समजताच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. पाथर्ली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, रविप्रकाश कुलकर्णी, राजीव जोशी, नारायण लाळे, प्रवीण दामले, हेमंत राजाराम, डॉ. प्रल्हाद देशपांडे उपस्थित होते.

गाजलेले कवितासंग्रह

द.भा. धामणस्कर यांचे ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’, ‘भरून आले आकाश’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. सत्यकथा, मौज, दीपावली, हंस, मराठवाडा अशा नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम केले. ‘ज्यांची वस्तू’ या त्यांच्या कवितेचा दहावीच्या पुस्तकात समावेश आहे.

साठोत्तरीतील महत्त्वाचे कवी

द.भा. धामणस्कर हे साठोत्तरी कवितेच्या प्रवासातील महत्त्वाचे कवी होते. ‘ग्रंथाली’च्या दशकाची कविता या दहा निवडक कवींच्या कवितांमध्ये त्यांचा समावेश होता. साहित्य अकादमीच्या ‘साठोत्तरी मराठी कविता’ या खंडातही त्यांच्या पाच कवितांचा समावेश केला होता. हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्येही त्यांच्या काही कवितांचे भाषांतर झाले आहे.