
देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र दलांसाठी 78 शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. 13 मरणोपरांत पुरस्कार आहेत. या पुरस्कारांमध्ये लष्कराचा शूर श्वान टायसन यालादेखील शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 9 कीर्ती चक्र पुरस्काराने गौरविण्यात येणार असून त्यापैकी 7 मरणोपरांत आहेत. राजपुताना रायफल्सचे मेजर आदित्य प्रताप सिंह यांना शौर्य चक्र एका बारसह प्रदान करण्यात येणार आहे. एक बार म्हणजे शौर्य पुरस्कार मिळण्याची दुसरी वेळ. मेजर आदित्य यांना यापूर्वी सेना पदकाने गौरविण्यात आले होते. जून 2026मध्ये हिंदुस्थान-म्यानमार सीमेजवळ दहशतवाद्यांविरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान दाखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. शौर्य पुरस्कारांमध्ये 19 शौर्य चक्र, 36 सेना पदक, 3 नौसेना आणि 5 हवाई दल पदक जाहीर झाले आहेत.
कीर्ती चक्रने यांचा होणार सन्मान
लेफ्ट. कर्नल मनियो फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी, हवालदार गजेंद्र सिंह (मरणोपरांत), हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंह (मरणोपरांत), एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंह (मरणोपरांत), एसजी कॉन्स्टेबल बलविंदर सिंग (मरणोपरांत), एसटी कॉन्स्टेबल तारिक हुसैन (मरणोपरांत), हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद (मरणोपरांत), निरिक्षक एसटीएफ सुनील कुमार (मरणोपरांत) यांचा कीर्ती चक्र पुरस्कारने सन्मान होणार आहे.
पोलीस आणि अग्निशमन दलातील 301 जणांना शौर्य पुरस्कार
देशातील पोलीस आणि अग्निशमन दलातील 301 वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकूण पोलीस दलातील 272 आणि अग्निशमन दलातील 29 जवानांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यापैकी 197 पुरस्कार हे कट्टर नक्षलग्रस्त भागातील जवानांना जाहीर झाले आहेत. जम्मू आणि कश्मीरमधील 51 तर इशान्येकडील 12 जवानांचा गौरव होणार आहे.






























































