
मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई धर्तीवर मोफत दर्जादार शिक्षण देण्याचे दाखवलेले स्वप्न अखेर हवेतच विरले आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष उभारण्यात आलेली भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरातील चार मजली शाळेची इमारत पालिकेने आता खासगी शिक्षण संस्थेच्या घशात घातली आहे. शाळेची इमारत वार्षिक भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.
महापालिकेला बांधकाम टीडीआरच्या मोबदल्यात ही इमारत विनामूल्य प्राप्त झाली असून जुने आरक्षण क्रमांक ११५ असलेल्या जागेवर ही अद्ययावत चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीमध्ये तब्बल २४ वर्गखोल्या आहेत. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना सीबीएसई धर्तीवर मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या इमारतीचा वापर करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. सुरुवातीला ही शाळा खासगी संस्थेच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र प्रशासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत ठोस पावले न उचलल्याने इमारत गेल्या काही काळापासून वापराविना पडून आहे. दरम्यान मीरा रोड येथील एन. एल. दालमिया शाळेला १५ जुलै रोजी भीषण आग लागली. यानंतर दालमिया शाळा व्यवस्थापनाने महापालिकेकडे २५ ते ३० वर्गखोल्या उपलब्ध असलेली पर्यायी इमारत देण्याची मागणी केली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने इंद्रलोक येथील सीबीएसई शाळेची इमारत दालमिया शाळेला वार्षिक भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
वर्षाला १ कोटी ४६ लाखांचे भाडे
इमारतीच्या भाड्यापोटी महापालिकेला दरवर्षी सुमारे १ कोटी ४६ लाख २६ हजार ४६१ रुपये उत्पन्न मिळणार आहे. मुळात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत सीबीएसई शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारलेली इमारत आता खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेने स्वतःची शाळा सुरू करण्याऐवजी मालमत्तेतून भाडे मिळवण्याला प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





























































