
तिसऱ्या मुंबईविरोधात उरणमधील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून बळीराजाचे वादळ उद्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी कोकण आयुक्तालयावर धडकणार आहे. या आंदोलनात शेकडो शेतकरी व भूमिपुत्र सहभागी होणार असून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तिसऱ्या मुंबईमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होणार असून भूमिपुत्रांचे अतोनात नुकसान होणार आहे. न्याय न मिळाल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारने ४ मार्च २०२४ रोजी अधिसूचना काढून रायगड जिल्ह्याच्या उरण, पनवेल व पेण तालुक्यांतील अंदाजित ३२३ चौरस किलोमीटर क्षेत्र नवनगर म्हणून घोषित केले. त्यानंतर १२४ गावांमधील शेतकऱ्यांनी २५ हजार हरकत नोंदवत आपला विरोध दर्शवला. मात्र हा विरोध डावलून सरकारने केएससी (कर्नाळा-साई-चिरनेर) नवनगरसाठी एमएमआरडीएची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नियुक्तीदेखील केली आहे. सरकारच्या या जुलमी कारभाराविरोधात सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनगरविरोधी समिती स्थापन केली आहे.
■ १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात माजी न्यायमूर्ती कोलसे-पाटील हेदेखील सहभागी होणार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हुतात्म्यांना अभिवादन करणार
गावोगावी जाऊन शेतकरी, जनतेमध्ये जनजागृती केली आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करून हजारो आंदोलक कोकण आयुक्तालयावर १५ ऑगस्ट रोजी थेट धडकणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष ठाकूर यांनी सांगितले.





























































