
नवी मुंबईतील हार्वर आणि ट्रान्स हार्वर मार्गावरील १४ रेल्वे स्थानके सिडकोने आज मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केली. रेल्वे स्थानक हस्तांतरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. त्यामुळे स्थानकांची देखभाल दुरुस्तीही व्यवस्थित होत नव्हती. मात्र आता मध्य रेल्वे प्रशासनाला या स्थानकांचा विकास करता येणार आहे.
मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्षे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांच्या इमारती या भव्य स्वरूपाच्या आहेत. मात्र हस्तांतरणाच्या वादामुळे या इमारतींची देखभाल दुरुस्ती होत नव्हती. ही सर्व स्थानके तातडीने रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती.





























































