
नागपंचमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर असतानाच रायगडच्या उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावच्या नागमूर्तींनी मुंबईकरांना भुरळ घातली आहे. याच चिरनेरमधून जवळपास पाच हजार नागोबा मुंबईला गेले आहेत. कलानगरच्या नागमूर्तींना मुंबईकरांची पसंती मिळाली असून आकर्षक आणि सुबक नागमूर्ती बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
नागपंचमीला नागमूर्तींची मुंबईतून मोठी मागणी असते. दरवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने चिरनेरच्या कलानगरातूनच विविध आकाराच्या नागाच्या मूर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येतात. चिरनेरमधील मूर्तिकार पिढ्यानपिढ्या मातीच्या नागमूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. सुबक आणि सजीव रूप असलेल्या नागमूर्तींचे रंगकाम आणि डोळ्यांची ठेवणी इतकी जिवंत असते की मुंबईकरांचे लक्ष या मूर्तींकडे वेधले जाते. या नागमूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीपासून बनवल्या जात असल्याने त्यांना मुंबईत प्राधान्य दिले जाते. फणा असलेल्या नागापासून ते शेषनागाच्या प्रतिकृतीपर्यंत विविध कलाकुसर असणाऱ्या नागमूर्ती येथे पाहायला मिळतात.
दोन महिन्यांपासून काम सुरू
शाडूच्या बाप्पाच्या मूर्तीपाठोपाठ नागमूर्तीसाठीही चिरनेर कलानगर प्रसिद्ध आहे. विविध आकाराच्या नागमूर्ती घडवण्याच्या कामाला दोन महिन्यांपासून सुरुवात केली जाते. कलानगरात नागमूर्ती बनवण्याचे काम आठ कारखान्यांत केले जाते. मागील अनेक पिढ्यांची परंपरा जोपासण्याचे काम कलानगरातील कुटुंबं करीत आहेत.
२५ ते १०० रुपयांपर्यंत किंमत
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागपंचमीसाठी चिरनेर कलानगरीतील कुंभार समाजाच्या महिला कारागिरांनी तयार केलेल्या पाच हजारांहून अधिक नागमूर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. लहान, मध्यम व साधारणतः मोठ्या आकाराची मूर्ती २५ ते १०० रुपये किमतीत किरकोळ दराने बाजारात विकल्या जातात, अशी माहिती मूर्तिकार नीलम चौलकर यांनी दिली.





























































