
>> दीपक बाहळीकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची केवळ नांदेड, दि. १४ अनास्थेमुळे अवनती होत आहे. भाषा विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या विभागातील प्राध्यापकांवर चकाट्या पिटण्याची वेळ आली आहे. २०११ मध्ये विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून नाट्य विभाग सुरू केला. मात्र पंधरा वर्षातच नाट्य विभागाला घरघर लागली आहे. या विभागाची प्रवेश क्षमता ५० असूनही सध्या केवळ पाच विद्यार्थी शिकत असल्यामुळे या विभागाला कोणत्याही क्षणी कुलुप लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
नांदेड, लातूर, परभणी तसेच हिंगोली या चार जिल्हयांतील कलासक्त विद्यार्थ्यांमधून चांगले कलाकार घडवण्यासाठी ४ मार्च २०११ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नाट्य विभाग सुरू करण्यात आला. तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. बी. निमसे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विभागाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कुलपती के. शंकर नारायण यांच्या उपस्थितीत झाले होते. सुरुवातीची काही वर्षे नाट्य विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल ऑफ फाईन अॅण्ड परफॉर्मिंग आर्ट्सच्या या दालनाच्या माध्यमातून बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अभ्यासक्रमाची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा उद्देश होता. सुरुवातीच्या काळात या विभागाने चांगले कलाकार घडवले. नाट्य कलावंतांना पदवीही मिळाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या विभागाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. प्रवेश क्षमता ५० असतानाही सध्या नाट्य विभागात केवळ पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीच नसल्यामुळे या विभागाचा प्रशासकीय खर्च परवडत नसल्यामुळे हा विभाग बंद करण्यात यावा, या मानसिकतेत विद्यापीठ प्रशासन आले आहे.
विद्यार्थी क्षमता ५० असताना चार पाच विद्यार्थी प्रवेश घेत असतील तर हे चित्र चिंताजनक आहे. नाट्यसंस्था, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नाट्य विभागात प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. नाट्यविभागाचे प्रमुख आणि त्या विभागातील प्राध्यापकांचीही जबाबदारी आहे. मात्र यावर्षी विद्यार्थी खूपच कमी असल्यामुळे वेगळा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.
– डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू
नाट्य विभाग सुरू होण्यासाठी आम्ही प्रचंड कष्ट घेतले. परंतु हा विभाग टिकून राहावा यासाठी विद्यापीठाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. विभागात सुविधांचा अभाव आहे. नाट्यशास्त्राबद्दल आस्था नसलेल्या मंडळीचा भरणा करण्यात आला आहे. अनुभवी तसेच नाट्यप्रेमी समन्वयक असणे गरजेचे आहे. नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाचे शुल्कही परवडणारे नाही, त्याचा विचार विद्यापीठ करणार की नाही?
– डॉ. नाथा चितळे, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य






























































